GRAMIN SEARCH BANNER

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने चिपळुणातील तरुणीची पाऊण लाखाची ऑनलाईन फसवणूक

Gramin Varta
226 Views

चिपळूण: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगमध्ये चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून चिपळुणातील एका ५१ वर्षीय व्यक्तीच्या मुलीला तब्बल ७७ हजार ८५४ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर भामट्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर ही रक्कम ट्रान्सफर करून घेऊन कोणतीही गुंतवणूक न करता तरुणीची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चिपळूण येथील शिवाजीनगर, किरण विहार संकुलातील तेजकिरण बिल्डिंगमध्ये राहणारे संतोष दत्ताराम जाधव (वय ५१) यांची मुलगी घरात असताना ही घटना घडली. ९ मे २०२६ रोजी सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान ‘आकाश’ नावाच्या एका अनोळखी व्यक्तीने तिच्याशी इन्स्टाग्राम अकाउंटवरून संपर्क साधला. त्याने तिला घरबसल्या शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. भामट्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क केला. त्यानंतर संशयित आरोपीने तिला वेगवेगळ्या बँक खात्यांचे डिटेल्स देऊन ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने वेळोवेळी एकूण ७७,८५४ रुपये ऑनलाईन स्वरूपात ट्रान्सफर केले.
काही वेळानंतर तिने आपले पैसे आणि मिळालेला नफा परत मागण्याचा प्रयत्न केला असता, समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

तसेच आरोपीने ती रक्कम कुठेही ट्रेडिंगमध्ये गुंतवली नसल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी सायबर पोलिसांकडे दाद मागितली. शेवटी २३ मे रोजी संध्याकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास संतोष जाधव यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकाश नावाचा वापर करणाऱ्या अनोळखी मोबाईल नंबर धारकाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(२) सह माहिती तंत्रज्ञान (आयटी) अधिनियम २००० च्या कलम ६६(डी) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १४३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3412902
Share This Article