संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथील हॉटेल लक्ष्मी गोळवली समोर एक भरधाव रिक्षा रस्त्याच्या साईडपट्टीला उभ्या असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडकून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालक स्वतः किरकोळ जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल रिक्षाचालकाविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १९ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आरोपी रिक्षाचालक अजय काशिराम पवार (रा. रांगाव चिखली सनगरवाडी, ता. संगमेश्वर) हा आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा (क्रमांक एम.एच.०८ बी.सी. ४९२४) घेऊन मुंबई-गोवा हायवेने चालला होता. महामार्गावरील मौजे धामणी गावच्या हद्दीत हॉटेल लक्ष्मी गोळवली समोर आला असता, रस्त्याची विशिष्ट परिस्थिती आणि रात्रीची वेळ लक्षात न घेता त्याने आपल्या ताब्यातील रिक्षा अत्यंत वेगाने, हयगयीने आणि बेदरकारपणे चालवली. त्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि हायवेच्या साईडपट्टीवर उभ्या असलेल्या किया सेल्टॉस कारला (क्रमांक एम.एच.०८ बी.ई.६१९२) रिक्षाने पाठीमागून उजव्या बाजूला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालक अजय पवार याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात घडल्यानंतर याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण बालाजी वानरे (वय ३९) यांनी २३ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी रिक्षाचालक अजय काशिराम पवार याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.







