संगमेश्वर : तालुक्यातील नायरी, बौद्धवाडी येथे सामाईक जागेतील आंब्याच्या झाडावरून झालेला वाद तुंबळ मारहाणीत परिवर्तित झाला असून, या घटनेत एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रावणी रंजित पवार (वय ३२) आणि संशयित आरोपी यांची घरालगत सामाईक जागा आहे. या जागेमध्ये दोन कलमी आंब्याची झाडे असून, २२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संशयितांमधील एका १६ वर्षीय बालकाने झाडावरील आंबे काढले. यावेळी फिर्यादीचे पती रंजित पवार यांनी “सामाईक झाडावरील आंबे तुम्ही एकटेच का काढता, हे काय तुमचे एकट्याचे झाड आहे का?” असा जाब विचारला.
या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर संशयितांनी एकत्र येत फिर्यादी श्रावणी पवार, त्यांचे पती रंजित जयराम पवार आणि मुलगी आस्था रंजित पवार यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच दगडाने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
याप्रकरणी अंकुश जयराम पवार, अमिता अंकुश पवार, दोन १६ वर्षीय विधीसंघर्षित बालक, मंगेश सिताराम पवार (वय ४५), माया जयराम पवार (वय ७५) तसेच मंगेश पवार यांचा २२ वर्षीय मुलगा अशा सात जणांविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.
आंब्याच्या वादातून नायरीमध्ये तुंबळ मारहाण; एकाच कुटुंबातील तिघेजण जखमी







