रत्नागिरी : रत्नागिरी आगाराच्या ताफ्यात आता आणखी भर पडली असून ‘जिजाऊ’ मालिकेतील पाच नवीन बस आगारात दाखल झाल्या आहेत. नव्याने दाखल झालेल्या या बसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधांनी युक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात जुन्या बसांच्या तुलनेत आधुनिक सुविधा असलेल्या ‘जिजाऊ’ बसांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी आगारासाठी पाच नवीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बस आगारात दाखल होताच चालक, वाहक तसेच प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन बसमुळे ग्रामीण तसेच लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवास अधिक सुलभ होणार असून, वारंवार बिघाड होणाऱ्या जुन्या बसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. उन्हाळी सुट्टीनंतर सध्या चाकरमान्यांची वाढलेली गर्दी लक्षात घेता या बस प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत.
दरम्यान, रत्नागिरी आगाराच्या ताफ्यात आधुनिक बसांची संख्या वाढत असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी काळात आणखी नवीन बस उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







