GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील सुरज झोरे हत्याकांडात धक्कादायक वळण

Gramin Varta
1.4k Views

मुख्य संशयित म्हात्रेच्या गर्लफ्रेंडला फितवण्याचा प्रयत्न बेतले जीवावर; आरोपींना २ जूनपर्यंत पोलीस कोठडी

रत्नागिरी : रत्नागिरीतील साईनगर भागात झालेल्या सुरज झोरे या २५ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्याप्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याची गर्लफ्रेंड या घटनेदरम्यान रत्नागिरीत सोबत आलेली होती. तिचे मन वळवून तिला फितवण्याचा प्रयत्न मयत सुरज याने केला होता. या संभाषणामुळे म्हात्रेच्या मनात निर्माण झालेल्या रागाच्या आणि संशयाच्या ठिणगीतूनच हा पूर्वनियोजित कट रचून सुरजचा कायमचा काटा काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही अट्टल आरोपींना न्यायालयाने २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. या थरारक हत्याकांडात आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्यामुळे, ‘मित्रांनीच मित्राचा काटा का काढला?’ याचे कारण उघड झाले असले, तरी या गुन्ह्यातील अनेक चक्रावून टाकणारे मुद्दे अजूनही अंधारात आहेत. पोलिसांसमोर या खुनाचा संपूर्ण गुंता सोडवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची सुरुवात २१ मे रोजी रात्री झाली. फिर्यादी नंदा रमेश फाले (रा. दहिसर, मुंबई) यांना रात्री १०.५३ वाजता एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने रत्नागिरीत साईनगर येथे तुमच्या भावाला काही लोकांनी मारले असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. नंदा यांनी तातडीने भावाशी संपर्क साधला असता, गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुरजने फोनवर बोलताना सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा केला. त्याचेच मित्र सोहम एकनाथ म्हात्रे (वय १८), अभिषेक देवानंद राठोड (वय २२) आणि नजीबुल हसीबार शेख उर्फ सोनू (वय २१) यांनी पूर्वनियोजित कट रचून त्याच्यावर कोयत्याने मानेवर, हातावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केल्याचे त्याने रडत रडत बहिणीला सांगितले. पोलिसांनी सुरजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल केले, मात्र धारदार शस्त्रांचे गंभीर वार असल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरजचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित करताच पोलिसांनी या गुन्ह्यात तात्काळ भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम १०३ (१) (खून) हे वाढवले आहे.

तपासादरम्यान पोलिसांना या खुनामागे अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. घटनेच्या दिवशी संशयित म्हात्रेची गर्लफ्रेंड देखील रत्नागिरीत आलेली होती आणि ती या सर्वांसोबत होती. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत म्हात्रे आणि मयत सुरज यांच्यातील वादाचे कोडे उलगडले आहे. सुरज झोरे याने त्या मुलीला ‘म्हात्रेवर भरवसा ठेवू नकोस’ असे सांगून तिचे मन वळवण्याचा म्हणजेच फितवण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब म्हात्रेच्या कानावर जाताच त्याचा तीळपापड झाला आणि त्या रागातून त्याने सुरजचा गेम करण्याचा पूर्वनियोजित कट रचला.

विशेष म्हणजे, म्हात्रेची गर्लफ्रेंड सोबत असतानाच तिच्यासमोर सुरजवर हा खूनी हल्ला करण्यात आला. तिन्ही आरोपींनी सुरजवर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. मानेवर, हातावर वार झेलत सुरज जिवाच्या आकांताने तिथून पळत सुटला. लगतच्या एका घराच्या कंपाउंडमध्ये उडी मारून त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; पण आरोपींनी त्याचा पाठलाग करून तिथेच त्याचा खेळ खल्लास केल्याचे समोर आले आहे.

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत आ. आवारे यांनी २२ मे रोजी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. मात्र, आरोपी कोठडीत गेले तरी पोलिसांसमोर पुढील १४ दिवसांत अनेक गंभीर प्रश्नांचा छडा लावण्याचे आव्हान आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान संशयित आरोपी सोहम म्हात्रेची ती गर्लफ्रेंड अचानक गायब झाली आहे. ती नक्की कुठून आली होती आणि घटनेनंतर लागोलाग कुठे गायब झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत. ही तरुणी पोलिसांसमोर आल्यानंतरच या घटनेतील सर्व गोष्टींचा प्रकर्षाने उगलडा होण्यास मोठी मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

यासोबतच, सुरजचा जीव घेण्यासाठी वापरलेला तो रक्ताने माखलेला धारदार कोयता आरोपींनी हत्या केल्यानंतर नक्की कोठे लपवून ठेवला आहे, तो जप्त करणे आणि आरोपींकडे आणखी अशी कोणती घातक शस्त्रे आहेत का, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपी आणि मयत सुरज हे घटनेच्या दिवशी किंवा त्यापूर्वी नक्की कुठे आणि कशासाठी भेटले होते, या सर्व घडामोडींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. केवळ मुलीच्या वादातून हा खून झाला की या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे, कोण्या तिसऱ्या व्यक्तीने चिथावणी दिली होती की तरुणांना ‘सुपारी’ देण्यात आली होती, या संशयास्पद पैलूवरही पोलीस कसून चौकशी करत आहेत. मित्रांनीच मित्राचा केलेला हा भयानक गेम आणि हत्येमागील हे अनुत्तरित रहस्य यामुळे संपूर्ण रत्नागिरीत प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस कोठडीत संशयितांच्या तोंडून आणखी काय सत्य बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3412902
Share This Article