रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी कालिका नगर – मुंबई विद्यापीठ उपकेंद्र परिसरामध्ये रस्ता बांधणीच्या चुकीच्या नियोजनाचा फटका आता स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना बसू लागला आहे. या परिसरात पाणी गटारात वाहून जाण्यासाठी कोणतीही जागा अथवा मार्ग न ठेवल्यामुळे, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी झालेल्या पावसामुळे या समस्येने उग्र रूप धारण केले.
रविवारी सकाळी आलेल्या पावसाच्या सरींमुळे रस्त्यावर अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या चारचाकी गाड्यांमुळे हे पाणी अंगावर उडून अनेक दुचाकीस्वार पूर्णपणे भिजले. यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला.
स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता तयार करताना नियोजनशून्य कारभार करण्यात आला आहे. रस्ता कामाचे सुपरव्हिजन करताना संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि ‘खिशात हात घालून’ केवळ पाहणी करण्याच्या भूमिकेमुळे ही दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याने रस्त्याचे संपूर्ण नियोजन चुकले आहे. पावसाळा तोंडावर असताना पहिल्याच पावसात ही स्थिती असेल, तर पुढे काय, असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन, पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग करावा आणि तात्काळ उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांकडून व वाहनधारकांकडून केली जात आहे.







