काय हवे आणि काय नको, यावर शासनाचे वेधले लक्ष!
रत्नागिरी: कोकणातील औद्योगिक धोरण आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यावर गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा या संघटनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अत्यंत मार्मिक आणि आक्रमक कार्टून प्रसिद्ध केले आहे. कोकणात विकासाच्या नावाखाली दिली जाणारी सापत्न वागणूक आणि स्थानिक जनतेच्या भावनांची होणारी गळचेपी यावर एका बोलक्या कार्टूनद्वारे थेट प्रकाश टाकण्यात आला आहे.चित्राच्या शीर्षकामध्ये ‘ कोकणाला जे हवंय ते लपवलंय… जे नकोय ते पुढे केलं जातंय… अशी अत्यंत चपखल ओळ लिहून प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवण्यात आले आहे.
काय आहे प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात?
गाव विकास समितीने प्रसिद्ध केलेल्या या डिजिटल व्यंगचित्रामध्ये एका बाजूला सत्ताधारी किंवा प्रशासकीय व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारी एक व्यक्ती दाखवली आहे, जी कोकणाला नेमके काय हवे आहे ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्तीच्या पाठीमागे लपवलेल्या फायलींवर कोकणच्या खऱ्या गरजा असणारे उद्योग म्हणजेच ‘फळ प्रक्रिया उद्योग’, ‘आयटी सेक्टर’, ‘ऑटोमोबाईल’, ‘कॉमर्स सेक्टर’ आणि ‘पर्यावरणपूरक उद्योग’ असे स्पष्ट लिहिले आहे.
दुसऱ्या बाजूला, स्थानिक तरुणाच्या समोर मात्र अणू ऊर्जा व रासायनिक प्रकल्प चा प्रस्ताव पुढे केला जात असल्याचे दाखवले आहे, ज्याला कोकणी जनतेचा नेहमीच तीव्र विरोध राहिला आहे.
चित्राच्या शीर्षकामध्ये “कोकणाला जे हवंय ते लपवलंय… जे नकोय ते पुढे केलं जातंय…” अशी अत्यंत चपखल ओळ लिहून प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवण्यात आले आहे.
उद्योगधंदा विरोधी ठरवण्याच्या मानसिकतेवर प्रहार
या कार्टूनच्या माध्यमातून संघटनेने म्हटले आहे की, कोकणाला खऱ्या अर्थाने आर्थिक सक्षम बनवणारे आणि निसर्गाचे रक्षण करणारे उद्योगधंदे मुद्दामहून कोकणात आणले जात नाहीत. याउलट, ज्या घातक किंवा रासायनिक उद्योगांना कोकणातून वारंवार आणि तीव्र विरोध होतो, तेच प्रकल्प जबरदस्तीने कोकणात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. विशेष म्हणजे, जेव्हा स्थानिक जनता आपल्या पर्यावरणासाठी आणि अस्तित्वासाठी या प्रकल्पांना विरोध करते, तेव्हा संपूर्ण कोकणाला आणि येथील जनतेला ‘उद्योगधंदा विरोधी’ किंवा ‘विकास विरोधी’ ठरवून बदनाम केले जाते, असा संताप गाव विकास समिती संघटनेने व्यक्त केला आहे.
गेल्या १० वर्षांपासूनचा संघर्ष आणि शासनाला सवाल
या पोस्टरच्या खालील भागात गाव विकास समितीने थेट शासनाला आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरताना म्हटले आहे की, “कोकणातील बेरोजगारी आणि स्थलांतर या विषयावर आम्ही मागील दहा वर्षांहून अधिक काळ सातत्याने बोलत आहोत. मात्र कोकणच्या मनात काय हे अजूनही राज्यकर्त्यांना कळत नसेल तर कोकणाने काय करावं?”
कोकणातील बेरोजगारीमुळे लाखो तरुणांना दरवर्षी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागते. हा स्थलांतराचा प्रश्न सुटावा म्हणून पर्यावरणपूरक विकासाची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. परंतु, राज्यकर्त्यांची मानसिकता बदललेली नाही, यावरच या कार्टूनच्या माध्यमातून थेट हल्लाबोल करण्यात आला आहे.
या सोशल मीडिया मोहिमेद्वारे गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा या संघटनेने शासनाला कोकणच्या संपूर्ण उद्योग धोरणावर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे असे मत गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे यांनी याबाबत बोलताना व्यक्त केले. कोकणच्या निसर्गाला हानी न पोहोचवता स्थानिक तरुणांना रोजगार देणारे आयटी, ऑटोमोबाईल आणि फळ प्रक्रिया सारखे पर्यावरणपूरक उद्योग शासनाने तात्काळ कोकणात आणायला हवेत, अशी आग्रही मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे असेही डॉक्टर मंगेश कांगणे याबाबत बोलताना म्हणाले. सध्या हे व्यंगचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, कोकणच्या औद्योगिक धोरणावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.







