GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी; ९० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांचा तपास पूर्ण

Gramin Varta
88 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गुन्हे तपासाच्या क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय आणि प्रभावी कामगिरी केली असून प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राखण्यात यश मिळविले आहे. जिल्हा पोलीस दलामार्फत विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा दर्जेदार, परिणामकारक आणि वेळेत तपास करण्यावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२५ ते ०१ एप्रिल २०२६ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात भाग १ ते ५ अंतर्गत एकूण १,७७७ गुन्हे दाखल झाले होते. पोलीस दलाने अत्यंत गतीने कारवाई करत यातील तब्बल ९२.३५% गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आहे. सध्या या विभागातील केवळ १३६ गुन्हे प्रलंबित असून हे प्रमाण अवघे ७.६५% इतके कमी आहे.

दुसरीकडे, दारुबंदी गुन्ह्यांसह भाग ६ अंतर्गत जिल्ह्यात एकूण २,५५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यापैकी ९६.७५% गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. या भागातील केवळ ८३ गुन्हे सध्या प्रलंबित असून प्रलंबित गुन्ह्यांचे हे प्रमाण केवळ ३.२५% आहे. पोलीस दलाची ही कामगिरी अत्यंत समाधानकारक आणि कौतुकास्पद मानली जात आहे.

या सर्व गुन्ह्यांच्या तपासावर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांचे प्रभावी पर्यवेक्षण होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तपासी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या जलद, सखोल व गुणवत्तापूर्ण तपासामुळेच हे यश साध्य झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जलद न्याय मिळावा, गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी जिल्हा पोलीस दल सातत्याने कटिबद्ध असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Total Visitor Counter

3483456
Share This Article