GRAMIN SEARCH BANNER

राज्यात उष्माघाताचे २९२ रुग्ण; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

Gramin Varta
41 Views

पुणे: राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर १ मार्च ते ५ जून या कालावधीत उष्माघाताचे एकूण २९२ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात उष्माघाताचे दोन नवीन रुग्ण आढळले असून, मृत्यूची कोणतीही नवीन घटना समोर आलेली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या एकूण १५ घटनांची नोंद करण्यात आली आहे.

यापैकी सहा मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचे अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून, उर्वरित प्रकरणांची तपासणी सुरू आहे.उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंचा विचार करता, लातूर जिल्ह्यात एक, अकोला जिल्ह्यात दोन, गडचिरोली जिल्ह्यात एक आणि जळगाव जिल्ह्यात दोन अशा एकूण सहा मृत्यूंची नोंद झाली आहे.दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने उच्चांक गाठत असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विशेषतः दुपारच्या कडक उन्हाच्या वेळेत विनाकारण बाहेर पडणे टाळावे, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, सैल व हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत, तसेच शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये याची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.उष्णतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, तीव्र डोकेदुखी होणे, शरीराचे तापमान वाढणे किंवा इतर त्रासदायक लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनीही उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3483456
Share This Article