GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : कोकण रेल्वे भरतीच्या मुलाखती विशाखापट्टणम येथे घेण्यास विरोध

Gramin Varta
60 Views

चिपळूण: कोकण रेल्वेच्या १३२ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आल्याच्या निर्णयाला कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे.

समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हा निर्णय कोकणातील बेरोजगार तरुणांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप केला आहे.

कोकण रेल्वेने १४ मे २०२६ रोजी भरतीबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, या भरतीसाठीच्या मुलाखती ८ जूनपासून विशाखापट्टणम येथे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. भरती कोकण रेल्वेची असताना मुलाखती महाराष्ट्राबाहेर घेण्यामागचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.मुकादम म्हणाले की, कोकण रेल्वेतील भरती प्रक्रिया महाराष्ट्र, गोवा आणि कोकणाशी संबंधित असताना मुलाखतीसाठी उमेदवारांना आंध्र प्रदेशात बोलावणे गैरसोयीचे आणि अयोग्य आहे. यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना आर्थिक आणि प्रवासाचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

कोकण रेल्वे भरतीच्या मुलाखती पूर्वीप्रमाणे मुंबई, बेलापूर, मडगाव आणि रत्नागिरी या केंद्रांवर घेण्यात याव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने केली आहे.दरम्यान, या निर्णयाविरोधात स्थानिक युवकांच्या हितासाठी लढा सुरू ठेवणार असल्याचा इशाराही शौकत मुकादम यांनी दिला आहे. कोकणातील बेरोजगार तरुणांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3483456
Share This Article