कमीत कमी नुकसान होईल, असा सरकारचा प्रयत्न – मुख्यमंत्री
मुंबई : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेमुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या पावसाकडे लागले आहे.
सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र त्यानंतर राज्यातील पावसाचा एकूण जोर तसेच मान्सूनच्या पुढील प्रगतीचा वेग किमान १५ जूनपर्यंत मंदावण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
हवामानाच्या सध्याच्या अंदाजानुसार १५ जूनपर्यंत राज्यभर समाधानकारक आणि व्यापक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि पेरणीचे नियोजन करताना हवामान विभागाच्या अंदाजाचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः पेरणीसाठी आवश्यक असलेला पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस या कालावधीत पडण्याची शक्यता नसल्याने पेरणीची घाई टाळावी, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस मर्यादित क्षेत्रांपुरता राहण्याची शक्यता असल्याने तो पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसून येत नाही.
याचबरोबर राज्यातील उष्णतेची लाटही कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किमान १२ जूनपर्यंत अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याच्या पातळीवरच राहू शकते. विदर्भ आणि खानदेशात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज असून मराठवाड्यात ते ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते.
कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानेही शेतकरी व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. आगामी वादळी पावसावर विसंबून पेरणी करू नये. तसेच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली, विद्युत रोहित्र, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या परिसरात थांबणे टाळावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी पावसाची स्थिती असली तरी पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कमी आहे. हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागांसाठी पिवळा इशारा जारी केला असून काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी आणि व्यापक पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले कमीत कमी नुकसान होईल, असा सरकारचा प्रयत्न
अल निनोचं वर्ष आहे. सरासरी पाऊस जरी ९२ टक्के असला, तरीदेखील दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून शेतकऱ्यांना मी आवाहन केलेलं आहे. पाऊस कमी असला, तरी कमी कमीत नुकसान होईल, असा प्रयत्न चालला आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले. ते नागपूरमध्ये बोलत होते.
दरम्यान, कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, असे म्हटले आहे.






