GRAMIN SEARCH BANNER

मुंबई विमानतळावर ५ कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; भाजप पदाधिकाऱ्यासह सहा जण अटकेत

Gramin Varta
493 Views

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या धडक कारवाईत आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. शनिवारी पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत पाच कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने आणि इतर संशयास्पद मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भाजपशी संबंधित एका पदाधिकाऱ्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.या कारवाईमुळे मुंबईसह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मुंबई विमानतळ परिसरात काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी ६ जून रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे अडीच वाजता विमानतळ परिसरात सापळा रचला. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती आणि सखोल चौकशी करण्यात आली. या तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे बाजारमूल्य पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

या प्रकरणात भाजपच्या कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांच्यासह रोहित कुमार सिंग, संतोष सुभाष, समीमुल्ला शहा, हमीद लेबेरीफखान आणि फलिल मोहम्मद कासिम या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून तस्करीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, अजित आचरेकर यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुहास माटे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षप्रवेश केला होता. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेच्या चिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे आता थेट एका पक्ष पदाधिकाऱ्याचे नाव सोन्याच्या तस्करीप्रकरणात समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, हे प्रकरण केवळ सोन्याच्या तस्करीपुरते मर्यादित नसून त्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटित टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. परदेशातील कोणत्या व्यक्ती किंवा गटांच्या माध्यमातून हे जाळे चालवले जात होते, याचा शोध घेतला जात आहे. या तस्करीमागील आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि परदेशी दुव्यांचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरू असून येत्या काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3483456
Share This Article