खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे-बोरज येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात अल्टो कार २० ते २५ फूट खोल दरीत कोसळल्याने कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जाऊन परत ठाण्याकडे निघालेल्या या कुटुंबाच्या वाहनाला हा अपघात झाला असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्टो कार (एमएच ०४ केडी ६१२८) ही रविवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथून मुंबई-ठाणेच्या दिशेने निघाली होती. रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही कार खेड तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथील सुरभी हॉटेलसमोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अचानक गाय आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणीजधाम यांची २४ तास विनामूल्य अपघात मदत सेवा देणारी रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्वरित उपचारासाठी भरणे येथील धन्वंतरी रुग्णालयात हलविले.
या अपघातात सिद्धी नाईक (वय २९), रिद्धी नाईक (वय २९), स्नेहल नाईक (वय ५८), सिद्धेश नाईक (वय ६५) आणि तेजस बोरकर (वय ३१) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमी ठाणे येथील रहिवासी असून त्यांच्या प्रकृतीवर धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र
रात्रीच्या वेळी महामार्गावर भटक्या जनावरांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.






