संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये बौद्धवाडी येथे रस्त्यावरील मोरी टाकण्याच्या कामावरून झालेला वाद हिंसक वळणावर जात जातीय अत्याचाराच्या गंभीर घटनेत परिवर्तित झाला. काम बंद करण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करत फावड्याने हल्ला व बेदम मारहाण केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी कोंड्ये बौद्धवाडी येथे रस्त्यावरील मोरी टाकण्याचे काम सुरू असताना दिलीप गणपत मोहिते (वय ५५) हे काम बंद करण्यासाठी तेथे गेले होते. यावेळी कामाच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद चिघळत गेल्यानंतर काही जणांनी मोहिते यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
यानंतर संतप्त झालेल्या आरोपींनी तेथील फावड्याचा वापर करून मोहिते यांच्या कंबरेवर व पाठीवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात मोहिते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी महेश प्रभाकर देसाई, उल्हास पांडुरंग देसाई, सागर सुरेश देसाई आणि नागेश उल्हास देसाई या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेमुळे कोंड्ये परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
संगमेश्वर : कोंडये येथे मोरीच्या कामाच्या वादातून वृद्धावर फावड्याने हल्ला, राजकीय नेत्यासह चौघांवर गुन्हा








