GRAMIN SEARCH BANNER

कुर्धे येथे साकवाचा स्लॅब कोसळून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
593 Views

रत्नागिरी :  कुर्धे-लिंगायतवाडी व खोताचीवाडी परिसरात एका अर्धवट बांधकाम झालेल्या छोट्या पुलाचा स्लॅब कोसळून मुकादमाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. पहिल्याच मुसळधार पावसामुळे नदीपात्रात आलेल्या पुरात अडकलेला गाळ व कचरा काढत असताना लोखंडी खांब सटकल्याने हा जड स्लॅब अंगावर कोसळला. अक्षय शिवाजी काटे (वय २६, रा. शांतीनगर, रत्नागिरी) असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या तरुण सुपरवायझरचे नाव आहे. या दुर्घटनेच्या वेळी पुलाजवळ असलेले दोन कामगार आणि चार पादचारी सुदैवाने बालंबाल बचावले असून, पुलाचा भाग कोसळल्यामुळे परिसरातील १०० ते सव्वाशे ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे.

कुर्धे परिसरातील लिंगायतवाडी, खोताचीवाडी आणि फडकेवाडी भागातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी साकव योजना कार्यक्रमांतर्गत ५५ लाख रुपयांच्या निधीतून या नदीवर नवीन पूल उभारण्याचे काम सुरू होते. या पुलाचा केवळ पहिला स्लॅब टाकून झाला होता आणि उर्वरित काम अर्धवट स्थितीत होते. दरम्यान, सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला. या पहिल्याच पुरात वाहून आलेला कचरा आणि गाळ पुलाच्या लोखंडी खांबांमध्ये अडकल्याने अर्धवट असलेल्या पुलाच्या संरचनेला मोठा धोका निर्माण झाला होता.
हा अडकलेला गाळ काढून पुलाला सुरक्षित करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुपरवायझर अक्षय काटे हे दोन कामगारांसह घटनास्थळी पोहोचले होते. काटे स्वतः नदीपात्रात उतरून अडकलेला कचरा काढत असतानाच, खाली आधार म्हणून लावलेले लोखंडी खांब अचानक निसटले. त्यामुळे पुलाच्या एका भागाचा प्रचंड वजनाचा स्लॅब थेट त्यांच्या अंगावर कोसळला. बाजूलाच काम करत असलेल्या इतर कामगारांनी अत्यंत तत्परतेने धाव घेत त्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र संपूर्ण स्लॅब खाली दाबले गेल्यामुळे अक्षय काटे यांचा ढिगाऱ्याखाली गुदमरून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या भीषण दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे वृत्त मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस अंमलदार, पंचायत समिती सदस्य नामदेव कोकरे, स्वाती शिंदे, विलास वारीसे, प्रवीण शिंदे तसेच स्थानिक ग्रामस्थ विजय शिंदे, हेमंत अभ्यंकर, आशुतोष अभ्यंकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उपस्थितांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर अक्षय काटे यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. या पुलाचे नुकसान झाल्यामुळे खोताचीवाडी आणि फडकेवाडी या भागातील सुमारे सव्वाशे लोकांचा मुख्य संपर्क तुटला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3482992
Share This Article