रत्नागिरी: जिल्ह्यातील प्राणघातक रस्ते अपघातांचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाने १ जूनपासून संपूर्ण जिल्ह्यात व्यापक ‘झिरो ॲक्सिडेंट ड्राईव्ह’ मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या विशेष मोहिमेच्या पहिल्या आठ दिवसांतच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांविरुद्ध पोलीस दलाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
या विशेष मोहिमेत १ जून ते ८ जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या अंतर्गत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४०१ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या १७३ जणांवर केसेस करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १६२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या १० चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीमही राबवली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संवाद कार्यक्रम आणि विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महामार्गावरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि इतर संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात आला आहे. या समन्वयातून संवेदनशील क्षेत्रे आणि संभाव्य अपघात स्थळांवर सूचना फलक, वेगमर्यादा फलक व दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाचे मानले जाणारे हातखंबा आणि खेडमधील भोस्ते घाट येथे विशेष सुरक्षितता उपाययोजना करण्यात आल्या असून, महामार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी रंबलर्स (Rumble Strips) देखील बसविण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी काळातही ही मोहीम आणि कठोर कारवाया अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवणे टाळावे, वेगमर्यादेचे पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेट आणि चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर आवर्जून करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले असून रस्ते अपघातमुक्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.







