नेपाळ महाप्रलय : ३५९ मृतदेह सापडले, सुमारे १,५०० नागरिकांचा शोध सुरू, २८८ भारतीयांचा समावेश

Gramin Varta
136 Views

47 हिमनद्या अत्यंत धोकादायक स्थितीत, भारतालाही धोका

काठमांडु:नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत ३५९ मृतदेह सापडले आहेत.

सर्वाधिक १३२ मृतदेह चितवन जिल्ह्यात सापडल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप सुमारे १,५०० नागरिकांचा शोध सुरू असून त्यामध्ये २८८ भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

बचाव पथकांनी आतापर्यंत २१ भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले असून त्यापैकी ११ जणांची ओळख पटल्याची माहिती आहे. पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, नेपाळ प्रशासनाने भोटेकोशी नदीसाठी नव्याने पूर इशारा जारी केला आहे. चीनमधील उपग्रह प्रतिमांनुसार पूरग्रस्त भागात नदीचा प्रवाह अडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून एक तलाव तयार झाला आहे. या तलावातील पाण्याची पातळी वाढत असून तो फुटल्यास भोटेकोशी नदीत पुन्हा अचानक मोठा पूर येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

त्यामुळे भोटेकोशी नदीच्या खालच्या भागात राहणारे नागरिक, प्रवासी तसेच बचाव कर्मचाऱ्यांना नदीकिनाऱ्यापासून आणि धोकादायक परिसरापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

घरे, पूल आणि इमारती मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्या आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या व्याप्तीचा अंदाज लावणे कठीण आहे. नेपाळमधील तब्बल 47 हिमनद्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. या हिमनद्या फुटल्या तर भयानक विनाश होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे. परिणामी भारतालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

- Advertisement -
Total Visitors :
4770924
Share This Article