बऱ्याच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या हस्त नक्षत्राच्या पावसाने बुधवारी (ता. ९) दुपारी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे भात खाचरातील भातपिके शेतात साचलेल्या गुडघाभर पाण्यात आडवी झाली आहेत.
त्यामुळे उरण तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, सर्वत्र सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात पावसाचा व्यत्यय ठरत असून गरबाप्रेमींमध्येही नाराजी आहे. सध्या उरण तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी भातशेती कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे कुठे कापणी; तर कुठे भाताची मळणी सुरू आहे.
आदिवासी वाड्यांमध्येही नाचणी, वरीची कापणी सुरू आहे; मात्र बुधवारी अचानक ऐन कापणीच्या हंगामात पावसाने हजेरी लावल्याने मेहनत वाया जात असून शेतकरी चिंतेत आहेत. या भागात बऱ्याच ठिकाणच्या भात खाचरातील पीक पूर्णपणे तयार झाले आहे; तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.
ज्या भात खाचरात पिके तयार झाली आहेत, अशी पिके शेतकऱ्यांनी कापून शेतात सुकवायला ठेवली आहेत. काही ठिकाणी भाताची मळणी सुरू आहे; परंतु अचानक पाऊस आल्यामुळे कापलेले भात भिजून गेले आहे; तर न कापलेले भातसुद्धा आडवे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात आहे.
-दीपक पाटील, शेतकरी, चिरनेरहस्त नक्षत्राच्या पावसामुळे भातपिके आडवी झाली आहेत. पाऊस वेळीच थांबला नाही तर पडलेले भात कुजून जाण्याची भीती आहे. भात लावणीपासून आमच्यावर नैसर्गिक संकटे येतच आहेत.