GRAMIN SEARCH BANNER

यंदा रब्बी पेरणीची प्रतीक्षा

Gramin Search
By Gramin Search 8 Views

पूर्वमशागत वेगात सुरू आहे. ८० टक्के शेती पेरणीसाठी तयार झालेली नाही. परंतु यंदा रब्बीची पेरणी अनेक शेतकरी वेळेत करू शकणार नाही, असे दिसत आहे. चांगल्या पावसाने रब्बीबाबत अपेक्षा आहे.

परंतु पेरणी वेळेत व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

खानदेशात रब्बीत हरभरा, मका, गहू, दादर ज्वारी आदी पिकांची पेरणी अनेक शेतकरी करतात. पण सध्या पूर्वमशागतीसह खरिपातील हंगाम आवरण्यासाठी मजूर मिळत नाहीत. शेतरस्ते खराब आहेत. बियाणे हवे तसे व हवे ते बाजारात दाखल झालेले नाही. यामुळे अनेक शेतकरी पेरणी करू शकलेले नाहीत.

पेरणीचे नियोजन

अनेकदा ऑक्टोबरमध्येच रब्बीची पेरणी सुरू होते. परंतु यंदा अपवादानेच ही पेरणी झाली आहे. कोरडवाहू रब्बी पेरणीसाठी खानदेशात धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावातील धरणगाव, अमळनेर, जळगाव, भडगाव, चाळीसगाव आदी भाग प्रसिद्ध आहे. पण काळ्या कसदार जमिनीत वाफसा नाही. पावसाळी स्थिती कायम आहे.

खानदेशात हरभरा पेरणी अधिक असणार आहे. यात एकूण सव्वादोन लाख हेक्टरवर हरभरा पीक राहील. तसेच मक्याची लागवडही एक लाख हेक्टरवर होऊ शकते. यापाठोपाठ दादर ज्वारी, गहू पिकाची पेरणी होईल. तसेच कांदा लागवडही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यंदा रब्बीची पेरणी ११० ते ११५ टक्के होईल, असाही अंदाज आहे.

पेरणी लांबण्याचे संकेत

खानदेशात आता दिवाळीनंतर रब्बीची पेरणी होईल, अशी स्थिती आहे. अद्याप कुठेही पेरणीला गती आलेली नाही. अलीकडेच हलका ते मध्यम पाऊस काही भागात आला. लागलीच उष्णतही वाढत आहे. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो. खानदेशात ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये पेरणीची लगबग सुरू होईल. परंतु यंदा पेरणी लांबेल, असे संकेत आहेत.

बियाण्यांच्या दरात वाढ

यंदा मका, गहू, हरभरा बियाण्यांच्या दरात वाढ झाली आहे. मका बियाण्याची तर टंचाई आहे. जादा दरात मका बियाणे घ्यावे लागत आहेत. अशातही शेतकऱ्यांना हवे तेवढे व हवे ते कापूस बियाणे मिळत नसल्याची स्थिती आहे.

यामुळे रब्बीचा खर्च वाढणार आहे. यातच पाऊस आल्यास नुकसान होईल, या भीतीनेही अनेक शेतकरी मका पेरणी किंवा लागवड करणे टाळत आहेत. कारण पुढे आणखी खर्च वाढेल व रब्बी हंगाम लांबेल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

Share This Article
Leave a comment