Mahatma Phule Karj Mafi: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु, अद्याप आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी 17 सप्टेंबरपर्यंत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी. सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रोत्साहनपर लाभासाठी 28876 कर्जदार शेतकऱ्यांचे खाती अपलोड केली आहेत. त्यापैकी 17949 कर्जदार शेतकऱ्यांचे खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 17,318 आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले असून, 10 सप्टेंबर 2024 अखेर 629 कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करणे प्रलंबित आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केल्यापैकी 16267 पात्र लाभार्थ्यांच्या बँक खाती रु. 32.42 कोटी इतकी रक्कम शासनामार्फत अदा करण्यात आली आहे.
तरी या याजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बाकी असलेल्या सर्व 629 जणांनी 17 सप्टेंबरपर्यंत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.
मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी वारस नोंद करुन घ्यावी
या योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या मयत शेतकऱ्याचा डेटा वगळणे आणि त्याऐवजी त्याचे वारसांची माहिती अपलोड करण्याबाबत कार्यपध्दती निश्चित केल्याप्रमाणे संबंधीत बँकेमार्फत दि. 17 सप्टेंबर पर्यंत मयत सभासदांची माहिती वगळण्याबाबत आणि दि.18 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2024 पर्यंत मयतांचे वारसांचा डेटा अपलोड करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
तरी संबंधित मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी आपलल्या बँक शाखेत संपर्क करून आवश्यक माहिती देवून वारस नोंद करण्यासाठी कर्जदार शेतकऱ्याचा मयत दाखला, वारसाचे आधार कार्ड, वारसाचा मोबाईल क्रमांक, वारसाचे बँक खाते क्रमांक इत्यादी माहिती देण्यास सहाय्य करावे म्हणजे लाभ मिळणे सुलभ होईल.