ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा; संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर गृह विभागाचा मोठा निर्णय

Gramin Varta
275 Views

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊपैकी सहा खासदारांनी घेतलेल्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकारण कमालीचे तापले असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने या सर्व बंडखोर खासदारांना ‘वाय प्लस’ (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाकडून नुकतीच संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीसाठी रीतसर पक्षादेश (व्हिप) जारी करण्यात आला होता, मात्र हा व्हिप पूर्णपणे झुगारून या सहा खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे हे खासदार आता शिंदेसेनेत सामील होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या धक्कादायक राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. दरम्यान, या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा झाली आहे. यानंतर आक्रमक पवित्रा घेत, “आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे, कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा” असा अप्रत्यक्ष इशाराच शिवसेना (उबाठा) प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत यांच्या या भूमिकेत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्ष एकत्र असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांच्या या जाहीर इशाऱ्यानंतर बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये तीव्र पडसाद उमटण्याची आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गुप्तचर विभागाच्या वायरलेस संदेशाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आणि संभाव्य धोक्यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर गृह विभागाने तातडीने या सहा खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश जारी केले आहेत. सुरक्षा वाढवण्यात आलेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम), संजय जाधव (परभणी), संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) यांचा समावेश आहे. या खासदारांना देण्यात आलेल्या ‘वाय प्लस’ सुरक्षा श्रेणीत साधारणपणे सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) आणि २४ तास कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. तसेच संबंधित जिल्हा व आयुक्तालय स्तरावरील विशेष समित्यांनी आपल्या पुढील बैठकीत या खासदारांची सुरक्षा अशीच कायम ठेवणे, त्यात अधिक वाढ करणे किंवा ती कमी करण्याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, असे निर्देशही या गुप्तचर संदेशात देण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, या सहा खासदारांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभाग आणि पोलीस यंत्रणा कमालीची खबरदारी घेत आहे.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *