साखरपा सकपाळवाडीतील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

saurabhsalvi26
11 Views

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील सकपाळवाडीमध्ये एका २७ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा अशोक सकपाळ (वय २७, रा. सकपाळवाडी, साखरपा) यांनी दुपारी सुमारे २.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान घराशेजारील वाड्यातील लाकडी वाशाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले.

यानंतर साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील तसेच साखरपा पोलीस पाटील शैलजा पवार आणि उपसरपंच शशिकांत लिंगायत यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पुढील तपासणीसाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.

दरम्यान, देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *