दापोली: रत्नागिरीच्या मातीत जन्मलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने सातासमुद्रापार झेंडा फडकवणाऱ्या प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी एक नवा इतिहास रचला आहे. अमेरिकन लष्कराचे अत्यंत कठीण आणि कसब पणाला लावणारे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करत, अमेरिकन सैन्यात भरती होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. कोकणच्या या कन्येने मिळवलेल्या यशाने संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
प्राजक्ता यांचे बालपण दापोलीत गेले असून, त्यांना लहानपणापासूनच सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, नियतीने काही वेगळेच ठरवले होते; एका दुर्दैवी अपघातामुळे त्यांचे भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. तरीही खचून न जाता, त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि पुढे अमेरिकेत स्थायिक होऊन ‘क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट’ म्हणून आपली ओळख निर्माण केली. केवळ विज्ञानाच्या क्षेत्रातच नव्हे, तर ग्लॅमरच्या जगातही त्यांनी ‘यूएसए मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स’ हा किताब पटकावून आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व सिद्ध केले.
देशसेवेची ओढ आणि सैन्याप्रती असलेल्या आदरामुळे त्यांनी वयाच्या एका टप्प्यावर पुन्हा एकदा सैन्यात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक खंबीरतेच्या जोरावर त्यांनी कठीण अशा लष्करी प्रशिक्षणाला सामोरे जाण्याचे आव्हान स्वीकारले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी केवळ उत्तीर्णच मिळवले नाही, तर उत्कृष्ट नेमबाजीसाठी त्यांना ‘मार्क्समनशिप पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. एवढेच नव्हे तर, बॅचमध्ये सर्वोच्च शैक्षणिक गुण मिळवून त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.
सध्या प्राजक्ता अमेरिकन सैन्याच्या मेडिकल विभागात कार्यरत आहेत. या संपूर्ण प्रवासात त्यांचे पती समीर बोंगाळे आणि परिवाराने दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळेच ही गरुडझेप शक्य झाली असल्याचे त्या नमूद करतात. विज्ञान, सौंदर्य स्पर्धा आणि आता थेट जागतिक लष्करी सेवेत ठसा उमटवणारी ही रत्नागिरीची लेक आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.
