रत्नागिरी जोतिबा डोंगरावर बंदी आदेश धुडकावून शस्त्रे बाळगणारे दोन तरुण जेरबंद

saurabhsalvi26
219 Views

पन्हाळा/प्रतिनिधी:  तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वाडी रत्नागिरी अर्थात श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा स्पष्ट भंग करत, घातक शस्त्रास्त्रांसह दहशत माजवणाऱ्या दोन स्थानिक तरुणांना जेरबंद करण्यात कोडोली पोलिसांना यश आले आहे. वाडी रत्नागिरी परिसरात गुरुवारी, दिनांक ११ रोजी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. रुद्र सोमनाथ मिटके आणि विवेक राजाराम बुणे (दोघेही राहणार वाडी रत्नागिरी, जोतिबा डोंगर) अशी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

वाडी रत्नागिरी परिसरामध्ये केवळ दहशत माजवण्याच्या आणि भीतीचे वातावरण तयार करण्याच्या हेतूने हे तरुण धारदार शस्त्रे सोबत बाळगून उघडपणे फिरत असल्याची खात्रीशीर माहिती कोडोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अंमलदार भरतकुमार मोळके यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी असलेल्या सेंट्रल प्लाझा येथे धाव घेतली. पोलिसांनी तिथे दबा धरून बसलेल्या या दोन्ही संशयित तरुणांना घेराव घालून रंगेहात ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या या कारवाई दरम्यान आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून सुमारे १६ इंच लांबीचा एक तीक्ष्ण धारदार कोयता आणि एक लोखंडी चाकू अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोन्ही तरुणांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ५१२ जोग हे करत असल्याची अधिकृत माहिती कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी दिली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *