मुंबई: मुंबईसह पुणे, नाशिक आणि कोकण पट्ट्यात अतिवृष्टी झाल्याने जलसाठ्यात काहीशी भर पडली असली, तरी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जलसंकटाचे सावट अजूनही गडद आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील ३ हजार २९ लहान-मोठ्या धरणांमध्ये केवळ ४३.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालखंडात हा साठा ५७.७३ टक्के होता, म्हणजेच यंदा पाणीसाठ्यात तब्बल १४ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा विचार करता १३८ मोठ्या धरणांमध्ये ४७.२५ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.७२ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये २८.५९ टक्के साठा उपलब्ध आहे.
प्रादेशिक स्तरावर पाणीसाठ्याचे चित्र पाहिले असता, कोकण विभाग ६२.९९ टक्क्यांसह सर्वाधिक सुस्थितीत आहे, तर पुणे विभागात ५०.८६ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. याउलट, मराठवाड्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक असून, छत्रपती संभाजीनगर विभागात अवघा २४.८८ टक्के पाणीसाठा असल्याने तेथील जलसंकटाची टांगती तलवार कायम आहे. तसेच अमरावती विभागात ४२.२३ टक्के, नाशिकमध्ये ४०.६३ टक्के आणि नागपूर विभागात ३९.८० टक्के पाणीसाठा आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, चासकमान, भामा आसखेड आणि वडज या धरणांतील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे, तर कोयना धरणात ४८.८५ टक्के साठा उपलब्ध आहे. जुलैच्या उर्वरित दिवसांत जोरदार पावसाच्या सरी बरसल्यास धरणांतील पाणी पातळीत सुधारणा होण्याची आशा हवामान विभागाने वर्तवली आहे, मात्र सध्याच्या आकडेवारीनुसार राज्याला पाणी टंचाईच्या सावटाचा सामना करावा लागत आहे.
