कुंभार्ली घाटाची दुरावस्था कायम; डांबरीकरण वाहून गेल्याने खडीमुळे अपघात

Gramin Varta
7 Views

चिपळूण: चिपळूण आणि पाटण तालुक्याला जोडणारा मुख्य मार्ग असलेल्या कुंभार्ली घाटाची अत्यंत दुरावस्था झाली असून पावसाळा सुरू झाला तरी या मार्गाची देखभाल आणि दुरुस्ती अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आणि वाहनचालकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. घाटात अनेक ठिकाणी धोकादायक वळणे असून गेल्या काही दिवसांत रस्त्यावर अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडी अजूनही पूर्णपणे बाजूला करण्यात आलेल्या नाहीत.

रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे न तोडल्यामुळे चालकांना समोरील वाहनाचा अंदाज येत नाही आणि परिणामी येथे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घाटातील पाणी वाहून नेणारी गटारे कचरा आणि मातीने तुंबली असल्यामुळे गटाराचे पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. सुमारे पंधरा किलोमीटर अंतराचे हे घाट पावसाळ्यात धुक्याने भरलेले असते त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही आणि त्यातच खड्ड्यांचा त्रास धोकादायक झाला आहे. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागर या भागातील प्रवाशांसाठी कुंभार्ली घाट सोयीचा असल्यामुळे येथून मालवाहू आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते, मात्र प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून केलेले डांबरीकरण पहिल्याच पावसात वाहून गेले आहे.

डांबर वाहून गेल्यामुळे रस्त्यावर आता फक्त टोकदार खडी शिल्लक राहिली असून या खडीवरून वाहने घसरत असून चाके पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पिंपळी ते शिरगाव या भागात एका ठेकेदार एजन्सीने रस्त्याच्या बाजूचे गवत काढण्याचे काम सुरू केले होते, परंतु रस्त्यावरील जीवघेणे खड्डे न भरता केवळ गवत काढण्याचे फार्स सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आणि नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे हे काम सध्या बंद पाडण्यात आले आहे. यामुळे आता घाटातील सर्वच दुरुस्तीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. कुंभार्ली घाट हा कोकण आणि पश्चिमेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा व्यापारी मार्ग असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या घाटाची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक आणि वाहनचालकांनी दिला आहे. आमचा दुरुस्तीच्या कामाला विरोध नाही, चुकीच्या कामाला विरोध आहे, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांचा अपघात होऊन त्यांना दुखापत होण्याची भीती आहे त्यामुळे प्रथम खड्डे भरा, अशी मागणी राजेंद्र खेतले यांनी केली आहे. यावर बोलताना राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूणचे सहाय्यक अभियंता श्याम खुणेकर यांनी सांगितले की, ठेकेदार एजन्सीला आम्ही तत्काळ खड्डे भरण्याची सूचना केली असून पावसाचा जोर कमी झाला की लगेच खड्डे भरण्याचे काम सुरू होईल आणि कुंभार्ली घाटातील धोकादायक वळणावर आमचे लक्ष आहे.

Total Visitors :
4573411
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *