मान्सून उशिरा दाखल झाल्याने मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामाला गती; दुसरी लेन सुरू होण्याची प्रतीक्षा

saurabhsalvi26
883 Views

रत्नागिरी /अजय सावंत : मान्सूनचे आगमन लांबल्याने मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. विशेषतः नाचणे परिसरातील जेके फाईल ते टीआरपी दरम्यानच्या मार्गावर संरक्षक भिंत उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, महामार्गाचे अपूर्ण राहिलेले टप्पे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधींनी अलीकडेच भेटी दिल्या. दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच मिऱ्या-नागपूर महामार्ग प्रकल्पाच्या कामालाही मुदतवाढ देण्यात आल्याने काम पूर्ण होण्याबाबत नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नाचणे परिसरात महामार्गाच्या एका बाजूचा सर्व्हिस रोड मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीची काही प्रमाणात सुविधा सुधारली आहे. मात्र दुसऱ्या बाजूचा सर्व्हिस रोड अद्याप अपूर्ण असल्याने त्या भागातील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

याशिवाय, महामार्गाच्या एका लेनचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याने ती वाहतुकीसाठी नेमकी कधी खुली होणार, याची उत्सुकता वाहनचालकांना लागली आहे. दुसरी लेन सुरू झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि प्रवास अधिक सुरक्षित व गतिमान होण्यास मदत होणार आहे.

स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी महामार्ग तसेच सर्व्हिस रोडचे काम उच्च दर्जाचे, सुरक्षित आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याची मागणी केली असून, या प्रकल्पामुळे भविष्यात रत्नागिरी शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4575635
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *