रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकासह अजिंक्यपद पटकावले. विशेष म्हणजे, सांघिक कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या महिला बुद्धिबळ संघाने सलग पाचव्या वर्षी कोंकण विभागाचे विजेतेपद आपल्या नावे करत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राखली. याच स्पर्धेत महाविद्यालयाच्या पुरुष संघानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक मिळवून उपविजेतेपदावर समाधान मानले.
कोंकण विभाग आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे एस. पी. हेगशेट्ये आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने प्रभावी खेळ करत सुवर्णपदक पटकावले.
विजेत्या महिला संघात हिमानी फाटक (एम.ए.), अस्मिता खानविलकर (तृतीय वर्ष विज्ञान), निर्मिती सुर्वे (प्रथम वर्ष विज्ञान), गौरवी गावडे (द्वितीय वर्ष विज्ञान), तेजश्री डोलकर (तृतीय वर्ष विज्ञान) आणि अस्मिया साटविलकर (प्रथम वर्ष विज्ञान) यांचा समावेश होता. तर रौप्यपदक मिळविणाऱ्या पुरुष संघात कौस्तुभ हर्डीकर (द्वितीय वर्ष विज्ञान), यश तरळ (एम.कॉम.), श्रेयस दाते (एम.कॉम.), हर्ष सुर्वे (एम.कॉम.), श्रवण बांदेकर (प्रथम वर्ष विज्ञान) आणि अद्वैत काळे (प्रथम वर्ष बीबीए) यांनी सहभाग घेतला.
महाविद्यालयाच्या दोन्ही संघांच्या या उल्लेखनीय कामगिरीमागे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे आणि श्री. विवेक सोहनी यांचे मार्गदर्शन, तसेच क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके आणि श्री. महेश खैरे यांचे सहकार्य लाभले.
महिला संघाने सलग पाचव्या वर्षी कोंकण विभागाचे अजिंक्यपद पटकावत साधलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, प्राध्यापक, कर्मचारी व सेवकवर्गाने विजेत्या महिला संघासह रौप्यपदक प्राप्त पुरुष संघाचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला बुद्धिबळ संघाचे सलग पाचव्यांदा अजिंक्यपद; पुरुष संघाला रौप्यपदक
Leave a Comment





