ठाकरे युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा रत्नागिरी नगरपालिकेला इशारा
रत्नागिरी : शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असून, नगरपालिकेने तातडीने त्यांचा बंदोबस्त न केल्यास पालिका प्रशासनाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा उबाठा युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिला आहे. फगरवठार येथील पोलीस लाइन परिसरात एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
फगरवठार पोलीस लाइन परिसरात खेळत असलेल्या एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला केला. कुत्र्यांनी त्या बालकाला फरपटत झाडीत नेले. ही घटना काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून बालकाची सुटका केली. नागरिकांनी वेळीच धाव घेतली नसती तर गंभीर दुर्घटना घडली असती, अशी भीती व्यक्त करत सावंत यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली.
मारुती मंदिर, बसस्थानक परिसर, माळनाका तसेच शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या कुत्र्यांमुळे मोठा धोका निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांत कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याचा दावा सावंत यांनी केला. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलेला असताना नगरपालिका प्रशासन केवळ करवसुलीत व्यस्त असून, नागरिकांच्या मूलभूत सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भटक्या कुत्र्यांचे तातडीने निर्बीजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करावा, तसेच यापूर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण नेमके कधी आणि किती प्रमाणात करण्यात आले, याची माहिती नगरपालिका प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी सावंत यांनी केली. पालिकेने येत्या काही दिवसांत ठोस उपाययोजना केली नाही आणि भविष्यात एखाद्या नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास रत्नागिरी नगरपालिकेविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात जाऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा सावंत यांनी दिल्याने या प्रश्नावरून पालिका प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. भटक्या कुत्र्यांबरोबरच शहरातील मोकाट गुरांचाही प्रश्न गंभीर बनला असून, त्यांचाही तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे. नागरिक नियमितपणे कर भरत असताना त्यांच्या मूलभूत गरजा आणि सुरक्षिततेची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाने पार पाडावी, अशी मागणी प्रसाद सावंत यांनी केली.
रत्नागिरी: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा पालिकेविरुद्ध गुन्हा दाखल करू
Leave a Comment






