खाडीपट्ट्याची मायबोली सोशल मीडियातून जगभर; ‘Khadeeja Talks’ने कोकणीला दिली नवी ओळख

Gramin Varta
880 Views

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोकणी बोली, संस्कृती आणि कोकणची ओळख जपण्याचा खदीजा नाईक यांचा प्रयत्न

रत्नागिरी : कोकणची माती, बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील गमतीजमती सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोचविणाऱ्या ‘Khadeeja Talks’च्या खदीजा आदिल नाईक यांनी मातृभाषा आणि संस्कृती जपण्याचा प्रभावी संदेश दिला आहे. ‘जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, पण घरासारखी वाटणारी आपली भाषा विसरू नका,’ असे आवाहन त्यांनी विशेष संवादातून केले.

मूळच्या रायगड जिल्ह्यातील निजामपूर येथील खदीजा नाईक यांचे विवाहानंतर चिपळूण, रत्नागिरीशीही घट्ट नाते जोडले गेले. सध्या त्या कुटुंबासह पुणे येथे वास्तव्यास असून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्यांनी ‘Khadeeja Talks’च्या माध्यमातून आशय निर्मितीला सुरुवात केली. कोकणाशी असलेले भावनिक नाते आणि आपल्या परिसरात लहानपणापासून ऐकलेली भाषा त्यांच्या निर्मितीचे मुख्य बळ ठरले.

खडीपट्टा भागात बोलली जाणारी कोकणी बोली त्यांनी आपल्या सोशल मीडिया आशयासाठी निवडली असली, तरी ही निवड जाणीवपूर्वक केलेली नसून ती त्यांच्या जगण्याचा आणि अनुभवांचा नैसर्गिक भाग असल्याचे त्या सांगतात. आपल्या भाषेतून व्यक्त होताना विनोद, भावना आणि प्रसंग अधिक जिवंत वाटतात. काही विशिष्ट शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार दुसऱ्या भाषेत सांगितल्यास त्यातील मूळ भाव हरवतो. आपल्या बोलीतील एखादा शब्द किंवा वाक्य ऐकताच ‘हा आपल्यातलाच आहे’ अशी भावना निर्माण होते, हेच या बोलीचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून भाषा आणि संस्कृती जपण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरू शकते, असा विश्वास खदीजा नाईक व्यक्त करतात. आजची पिढी सोशल मीडियावर मोठा वेळ घालवते. त्यामुळे आपल्या भाषेलाही या माध्यमावर स्थान मिळाले पाहिजे. भाषा जपण्यासाठी नेहमीच औपचारिक उपक्रमांची गरज नसते. विनोद, बालपणीच्या आठवणी, खाद्यसंस्कृती, कौटुंबिक प्रसंग किंवा अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओमधूनही एखादी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकते. त्यांच्या व्हिडिओला एखाद्याने आपल्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना दाखवत ‘आपल्याकडेही अगदी असेच व्हायचे,’ असे सांगणे, हीच भाषा जिवंत राहण्याची प्रक्रिया असल्याचे त्या मानतात.

कोकणी भाषेचे वैशिष्ट्य सांगताना त्या म्हणतात की, कोकणाच्या वेगवेगळ्या भागांत गेल्यानंतर भाषेतील शब्द, उच्चार आणि वाक्प्रचार बदलताना दिसतात. मात्र खडीपट्टा भागातील बोलीची खासियत तिच्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीत आहे. योग्य शब्द योग्य ढंगाने उच्चारला की त्यातून संपूर्ण प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. काही शब्द आणि वाक्प्रचार विशिष्ट भागातील लोकांनाच सहज समजतात आणि ते ऐकताच आपलेपणाची भावना निर्माण होते. हाच या बोलीचा सर्वात मोठा ठेवा असल्याचे त्या सांगतात.

आजच्या काळात अनेक तरुण आपल्या मातृभाषेपासून आणि पारंपरिक संस्कृतीपासून दूर जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा इतर भाषा शिकण्यात काहीही गैर नाही. बदलत्या जगात अनेक भाषा अवगत असणे आवश्यकच आहे. मात्र दुसरी भाषा शिकताना आपल्या मातृभाषेला विसरण्याची गरज नाही. घरामध्ये कोकणी बोला, आई-वडील आणि आजी-आजोबांशी कोकणीत संवाद साधा आणि आपल्या मुलांनाही ही भाषा ऐकू द्या, असे त्या आवर्जून सांगतात. कारण मातृभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून त्यामध्ये आपल्या कुटुंबाच्या आठवणी, कथा, विनोद आणि संस्कृतीचा वारसा जपलेला असतो.

सोशल मीडियावरील कौतुकासोबतच टीका आणि ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. मात्र विधायक टीका स्वीकारून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करते, तर केवळ ट्रोलिंगसाठी केलेल्या नकारात्मक टिप्पण्यांकडे फारसे लक्ष देत नाही, असे त्या स्पष्ट करतात. शेकडो जणांकडून मिळणारे प्रेम आणि प्रोत्साहन एका नकारात्मक प्रतिक्रियेपेक्षा निश्चितच मोठे असते. त्यामुळे नकारात्मकतेपेक्षा आपल्या कामावर आणि प्रेक्षकांच्या प्रेमावर लक्ष केंद्रित करण्याला त्या अधिक महत्त्व देतात.

आपल्या प्रवासातील यशाचे श्रेय त्या कोणताही संकोच न करता पती आणि ‘पप्पा’ यांना देतात. सोशल मीडियावर काही सेकंदांचा व्हिडिओ सहज दिसत असला, तरी त्यामागे कल्पना, चित्रीकरण, अनेक रिटेक्स आणि नोकरी, घर व कुटुंब सांभाळण्याची मोठी कसरत असते. या सर्व काळात पतीने दिलेला खंबीर पाठिंबा आणि प्रोत्साहन मोलाचे ठरले. तसेच, ‘तुला हे सगळे करण्याची काय गरज आहे?’ असे न म्हणता नेहमी प्रोत्साहन देणारे पप्पा आपल्या प्रवासातील महत्त्वाचा आधार असल्याचे त्या सांगतात. आपल्याला पुढे जाण्यासाठी जवळच्या माणसांकडून मिळणारे ‘तू चांगले करत आहेस, असेच पुढे जात राहा’ हे काही शब्दही मोठा आत्मविश्वास देतात, असे त्या म्हणतात.

कायमस्वरूपी ओळख निर्माण करण्यासाठी आधुनिक होणे आणि आपल्या मुळांपासून दूर जाणे आवश्यक नाही, असा ठाम संदेश खदीजा नाईक यांनी तरुण पिढीला दिला आहे. परदेशात शिक्षण घ्या, मोठी कारकीर्द घडवा, अनेक भाषा शिका, जगाच्या कोणत्याही भागात राहा; मात्र अभिमानाने ‘ही माझी भाषा आहे आणि हीच माझी ओळख आहे,’ असे सांगण्याचे धैर्य कायम ठेवा, असे त्या म्हणतात.

Khadeeja Talks’ हे नाव त्यांच्या नावाशी जोडलेले असले, तरी त्यामधील कथा आणि अनुभव हे केवळ त्यांचे नसून संपूर्ण कोकणी समाजाच्या सामूहिक आठवणी आहेत. त्यांच्या व्हिडिओमुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, बालपणाची आठवण झाली, कुणी आपल्या आई-वडिलांना फोन केला, कुणाला क्षणभर कोकणाची आठवण झाली किंवा एखाद्याला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान वाटला, तरी आपले काम सार्थकी लागले, अशी भावना खदीजा नाईक व्यक्त करतात. त्यांच्या मते, मातृभाषेचा अभिमान जपणे ही केवळ परंपरा नाही, तर पुढच्या पिढीला आपल्या मुळांशी जोडून ठेवण्याची जबाबदारी आहे.

- Advertisement -

Total Visitors :
4820380
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *