आमदार भास्करराव जाधवांना भाजपमध्ये येण्याचे जाहीर आमंत्रण; प्रमोद जठारांच्या खुली ऑफरमुळे कोकणच्या राजकारणात चर्चांना उधाण

Gramin Varta
201 Views

चिपळूण : कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना तोंड फुटले असून ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी थेट आणि खुली ऑफर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. भास्कर जाधव यांच्यासारख्या अनुभवी आणि प्रभावी नेतृत्वाचा त्यांच्या पक्षात अपेक्षित सन्मान होत नसल्याचे सांगत कोकणच्या विकासासाठी विकासाभिमुख शक्तींनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. चिपळूण येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात आ. प्रमोद जठार आणि आ. भास्कर जाधव हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते आणि दोन्ही नेत्यांनी एकत्र वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जठार यांनी भास्कर जाधव यांच्याविषयी कौतुकाची भूमिका घेत त्यांना भाजपमध्ये येण्याचे थेट आवाहन केले. यावेळी जठार म्हणाले की, भास्कर जाधव हे कोकणातील ज्येष्ठ, अनुभवी आणि जनतेशी नाळ जुळलेले नेते असून त्यांच्या अनुभवाचा राज्याच्या आणि विशेषतः कोकणच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे उपयोग होणे आवश्यक आहे आणि त्यांनी भाजपमध्ये येऊन विकासाच्या राजकारणात सहभागी व्हावे. जठार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली असून विशेष म्हणजे त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर वैयक्तिक टीका न करता त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने या वक्तव्याची अधिक चर्चा होत आहे. यावेळी दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सहदेव बेटकर, तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली होती आणि त्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

त्यानंतर आता आमदार प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना जाहीरपणे भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. भाजपकडून सातत्याने होत असलेल्या या सकारात्मक संकेतांवर ठाकरे शिवसेना किंवा स्वतः आमदार भास्कर जाधव काय भूमिका घेतात, याकडे आता कोकणातील राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4573425
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *