रत्नागिरी: रत्नागिरी डफळचोळवाडी परिसरात आज, रविवार, २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास एका एसटी बसला अपघात झाला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने खाडी ओलांडताना बस रस्त्यावरून घसरली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे रस्ते कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डफळचोळवाडीतून रत्नागिरीच्या दिशेने निघालेली ही बस गावातून फिरत असताना खाडी ओलांडताना अपूर्ण रस्त्यामुळे अचानक स्लिप झाली. रस्त्याचे काम अर्धवट असल्याने आणि आवश्यक खबरदारीचे उपाय योजले नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस बाजूला घसरली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नाही, ही दिलासादायक बाब आहे.
स्थानिक नागरिकांनी या अपघाताचे खापर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामावर फोडले आहे. अपूर्ण काम आणि आवश्यक सुरक्षा उपायांचा अभाव यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेमुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या दर्जा आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत आणि रस्त्यांच्या कामांमध्ये योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.