राजापूर/ तुषार पाचलकर:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे ७४ वर्षीय वृद्धा श्रीमती वैशाली शांताराम शेटे यांच्या मृत्यू प्रकरणाला खळबळजनक वळण आलं आहे. राजापूर पोलिसांनी या घटनेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
बुधवारी सकाळी रायपाटणमधील त्यांच्या राहत्या घरात श्रीमती शेटे यांचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक तपासात त्यांच्या डोक्यावर जखम असल्याचे आणि शरीर काळे पडल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या कानातील रिंगा जागच्या जागी होत्या, मात्र अंगावरील सोन्याची चेन गायब होती, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हातात घेतली. फॉरेन्सिक लॅबची टीम देखील गुरुवारी रायपाटणमध्ये दाखल होऊन पुरावे संकलित केले.
राजापूर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, बुधवारी रात्री उशिरा रायपाटण येथे त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले.
रायपाटण येथील वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अखेर खुनाचा गुन्हा दाखल
