खेड : कोकण रेल्वेने 2025 या वर्षात उत्कृष्ट सार्वजनिक उपक्रम म्हणून आपली वेगळी छाप पाडत तीन नामांकित राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
कोकण रेल्वे प्रशासनाने पारदर्शक कारभार, गतिमान कामकाज आणि प्रवाशांना सुविधा देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले असून, त्याचा गौरव म्हणून हे पुरस्कार देण्यात आले आहेत. संतोषकुमार झा यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेने केवळ सेवा सुधारण्यावर भर न देता, विश्वासार्हता आणि नवोपक्रम यावरही लक्ष केंद्रित केले.
संशोधन आणि नवोपक्रमातील सर्वोत्तम सार्वजनिक उपक्रम, वस्तू आणि सेवा खरेदीमध्ये उत्कृष्ट कामगिरी, तसेच प्रशिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रातील सर्वोत्तम सार्वजनिक उपक्रम म्हणून कोकण रेल्वेला गौरवण्यात आले आहे. नवीन कल्पना, सुरळीत कार्यप्रणाली आणि कौशल्यविकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश कोकण रेल्वेच्या वाट्याला आले आहे.
या तीनही पुरस्कारांमुळे कोकण रेल्वेची देशपातळीवर प्रतिष्ठा अधिक बळकट झाली असून, सार्वजनिक सेवा क्षेत्रात कोकण रेल्वेचा एक आदर्श उपक्रम म्हणून उल्लेख होतो आहे.
कोकण रेल्वेचा तीन नामांकित राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान
