संगमेश्वर : युवासेनेच्या वतीने ई.एस.के. कॅम्पसमध्ये ‘सायबर सुरक्षा व व्यसनमुक्ती’ जनजागृती

Gramin Varta
46 Views

कडवई / नियाज खान : वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबरोबरच तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि उज्ज्वल भविष्य घडवावे, या उद्देशाने युवासेनेच्या वतीने कडवई येथील ई.एस.के. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्ती मार्गदर्शन’ या जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश केणी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर विश्वाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, वैयक्तिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी आणि ऑनलाइन व्यवहारांमध्ये कोणती दक्षता घ्यावी, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

तरुण वयात व्यसनांच्या आहारी जाण्याचे आरोग्य, शिक्षण आणि भविष्यातील करिअरवर होणारे परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक मितेश केणी यांनी केले. शिक्षण, कौशल्यविकास आणि सकारात्मक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून स्वतःचे भविष्य घडवावे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यशाळेला परिसरातील विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कडवई इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई, काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स तसेच भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाला जमातुल मुस्लिमीन कडवईचे चेअरमन सिकंदर जुवळे, ई.एस.के.चे अध्यक्ष सादिक काझी, युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके, विभाग प्रमुख संदेश फडकले आणि उपविभाग प्रमुख निहाल खान यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सावंत यांनी केले.

सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके, विभाग प्रमुख संदेश फडकले, उपविभाग प्रमुख निहाल खान यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Total Visitors :
4712427
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *