संगमेश्वर धामणी येथे कारचा अपघात; डायव्हर्जन, दिशादर्शक फलक, बॅरिकेड नसल्याने वाहन चालक बुचकळ्यात

Gramin Varta
300 Views

निवळी घाट, तळेकांटे, वांद्री, उक्षी येथे डायव्हर्जन व्यवस्थित दिसत नसल्याने होताहेत अपघात

संगमेश्वर : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गवर चौपदरीकरणाचे काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षेकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र संगमेश्वर ते बावनदीदरम्यान पाहायला मिळत आहे. याचा फटका वाहन चालकाना बसत आहे. धामणी येथे डायव्हार्जन न दिसल्यामुळे कारला अपघात झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

महामार्गावर अचानक डायव्हर्जन करण्यात येत असल्यामुळे वाहनचालकांना पूर्वसूचना देण्यासाठी आवश्यक दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आदी सुरक्षाव्यवस्था करण्यात येत नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. याच धोकादायक व्यवस्थेचा फटका आज दुपारी धामणी येथे एका कारला बसला.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महामार्गावरील डिव्हायडर अचानक बंद केला जात आहे. मात्र डिव्हायडर बंद केल्यानंतर त्या ठिकाणी वाहनचालकांना सावध करणारे कोणतेही ठळक सूचना फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्ग व्यवस्थित असल्याचे समजून वाहनचालक वेगाने वाहने चालवत असतात. अचानक समोर डायव्हर्जन किंवा बंद केलेला डिव्हायडर आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते आणि अपघाताची परिस्थिती निर्माण होते.

धामणी येथे आज झालेला कारचा अपघात याच प्रकारच्या नियोजनशून्य वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी वाहनचालकांना पुरेशा अंतरावरून डायव्हर्जनची माहिती मिळणे आवश्यक असताना प्रत्यक्षात सुरक्षेच्या मूलभूत उपाययोजनांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

संगमेश्वर ते रत्नागिरीदरम्यान वांद्री, तळेकांटे, उक्षी तसेच निवळी घाटात अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच डायव्हार्जन अचानक बदलले जात असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तळेकांटे आणि बावनदी परिसरात महामार्गाच्या डोंगरकटाईचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी पुढील रस्ता वाहनचालकांना व्यवस्थित दिसत नाही. संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने येणारी वाहने वेगाने येत असताना अचानक समोर डोंगरकटाईचे काम, डायव्हर्जन किंवा बंद केलेला डिव्हायडर आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे महामार्ग व्यवस्थित झालेला असल्याचे भासते आणि त्यामुळे वाहनचालक साहजिकच वेगाने वाहने हाकतात. अशा परिस्थितीत काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य अंतरावर सूचना फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि रात्री स्पष्ट दिसणारी सुरक्षा व्यवस्था नसल्यास वाहनचालकांना धोका निर्माण होतो. केवळ डिव्हायडर बंद करून वाहतूक वळवणे म्हणजे सुरक्षा व्यवस्था पूर्ण झाली असे होत नाही.

या प्रकारामुळे आता संतप्त सवाल उपस्थित होत आहे की, ठेकेदाराने महामार्गाचा ठेका घेतला आहे की वाहनचालक आणि नागरिकांना त्रास देण्याचा ठेका घेतला आहे? महामार्गाचे काम करताना नागरिकांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही वाहनचालकांकडून केला जात आहे.

धामणीतील अपघातानंतर तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने संगमेश्वर ते भावनदीदरम्यानच्या सर्व डायव्हर्जन आणि कामाच्या ठिकाणांची तातडीने पाहणी करावी. वांद्रे, तळेकांटे, उक्षी आणि भावनदी परिसरातील धोकादायक ठिकाणी पुरेसे दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स आणि रिफ्लेक्टर बसवावेत. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यापेक्षा आजच प्रशासनाने जागे होण्याची गरज आहे.

Total Visitors :
4680890
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *