संगमेश्वर:- परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण चा स्वतंत्र विभाग असलेल्या पंचकोश आधारित गुरुकुल विभागात नित्यनेमाने वेगवेगळ्या उपक्रमांचे उत्साहात आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी नियोजनबद्ध उपक्रम घेतले जातात.याची दखल घेऊन ०९ ऑगस्ट क्रांती दिन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अर्थात क्रांती सप्ताह अशा औचित्याने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या बाल जगत या कार्यक्रमासाठी गुरुकुलातील मुलांनी गायलेली पाच सामूहिक गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत.
अभ्यासाच्या जोडीनेच कला, संगीत,खेळ, हस्तकला आणि विविध कौशल्य यांचे विशेष मार्गदर्शन मुलांना गुरुकुलच्या अकारा तासाच्या वेळापत्रकातच प्रयत्नपूर्वक केले जाते.
गुरुकुलच्या रचनेत गेल्यावर्षी गेल्या शैक्षणिक वर्षात संस्थेच्या पुढाकाराने कै.आप्पासाहेब दांडेकर संगीत कक्ष अशी स्वतंत्र संगीत कक्षाची भर पडली. हार्मोनियम,तबला, पखवाज, ढोलकी, ढोलक,पायपेटी सिंथेसायझर(इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड), क्लॅप बॉक्स, बासरी अशा वाद्यांनी सुसज्ज संगीत कक्षात नियमितपणे गायन आणि वाद्य वादनाचे मार्गदर्शन होत असते. याच मार्गदर्शनातून गुरुकुल मधील संगीत विषयक आवड असणाऱ्या मुलांचा एक स्वतंत्र गीत मंच तयार करून त्यामाध्यमातून मुलांना वैयक्तिक आणि सामूहिक गायन वादनाचे अनुभव आणि संधी देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
अशा विविध कार्यक्रमातून मिळणाऱ्या संधी आणि अनुभवामुळे या गीत संघातील मुला मुलींची २५-३० गाणी उत्तम प्रकारे सादरीकरण करु शकतात अशी क्षमता विकसित झाली आहे. देशभक्ती गीते, स्फूर्ती गीते, समूहगीते या सोबतच भजन, अभंग,पोवाडा असे लोकसंगीतही उत्तम प्रकारे सादर करू शकणाऱ्या या मुलांना आणखीन एक अभिनव संधी रत्नागिरी आकाशवाणीच्या माध्यमातून मिळाली.
ध्वनी मुद्रणाच्या निमित्ताने आकाशवाणी रेडिओ केंद्र क्षेत्रभेट म्हणून भेट देताना या सगळ्या मुलांनी येथे होणारे कार्यक्रम, उपक्रम, विविध विभाग, तिथे कार्यरत असणारी माणसे इत्यादी मधून रेडिओ ची समृद्ध परंपरा समजून घेतली. गुरुकुल विभागातील मुलांनी ध्वनिमुद्रणासाठी गायलेली ही गाणी गुरुकुलातच तयार झालेली गाणी आहेत हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य!
या सर्व नवीन गाण्यांची शब्दरचना, गीत रचना, चाल, संगीत आणि संगीत संयोजन ही सर्व प्रक्रिया गुरुकुलातील मुलांच्या समक्ष आणि त्यांच्या सहभागाने झाली असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने सांगीतिक नवनिर्मितीचा अनुभव मिळाला. गुरुकुलात तयार झालेली ही गाणी आकाशवाणी सारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रसार माध्यमातून ध्वनिमुद्रित होत आहेत याचा आम्हा सर्व गुरुकुलाला विशेष अभिमान आहे. अस गाणारं गुरुकुल आपण सर्वजण येत्या रविवारी ०९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता रत्नागिरी आकाशवाणीच्या रेडिओ केंद्रावरून बाल जगत या कार्यक्रमातून ऐकू शकणार आहात तर नक्की ऐका असं आवाहन गुरुकुल विभागाने केलं आहे.
युनायटेडचे गाणारे गुरुकुल आकाशवाणीवर !
Leave a Comment





