बावनदीत तरुण बेपत्ता प्रकरण
संगमेश्वर : तालुक्यातील बावनदीच्या जुन्या पुलावरून रेवाळेवाडी येथील ४२ वर्षीय महेश नारायण भरणकर यांनी उडी घेतल्याची घटना घडून दोन दिवस उलटले, तरी त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र, या घटनेइतकीच धक्कादायक बाब म्हणजे हद्दीच्या प्रश्नावरून अद्याप अधिकृत पोलीस नोंद झालेली नसल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महेश यांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात शोधमोहीम सुरू असताना, दुसरीकडे बावनदीवरील जुना पूल नेमका संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो की रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या, यावरून प्रशासकीय गोंधळ निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या तांत्रिक पेचामुळे अधिकृत कागदोपत्री प्रक्रिया रखडल्याचा आरोप होत आहे.
घटनेनंतर दोन दिवस उलटूनही अधिकृत नोंद न झाल्याने, संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या जीवापेक्षा हद्दीचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत प्रथम मदत आणि कायदेशीर प्रक्रिया तत्काळ सुरू होणे अपेक्षित असताना, हद्दीच्या वादामुळे विलंब होणे गंभीर असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितीश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात व परिसरात शोधमोहीम सुरू आहे. मात्र, शनिवारी सायंकाळपर्यंत महेश भरणकर यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता.
या संपूर्ण प्रकरणात हद्दीचा गोंधळ नेमका का निर्माण झाला, अधिकृत नोंद करण्यास विलंब का झाला आणि त्याची जबाबदारी कोणाची, याची चौकशी करून संबंधितांकडून स्पष्टीकरण घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शोध सुरू नदीत… पोलीस अडकले हद्दीत!
Leave a Comment







