संगमेश्वर : तालुक्यातील बोरसुतची लेक यामिनी खामकर हिने युनायटेड किंगडममध्ये आयोजित WOMED FESTIVAL 2026 मध्ये आपल्या ढोल वादनाने जागतिक मंचावर भारताचा आणि महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
जगभरातील कलाकारांच्या साक्षीने आणि हजारो रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत यामिनी खामकर आणि तिच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या दमदार ढोल वादनाने उपस्थितांची मने जिंकली. या जागतिक महोत्सवात मिळालेल्या या यशामुळे संगमेश्वर तालुका आणि संपूर्ण कोकणात आनंदाचे वातावरण पसरले असून, यामिनीच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आपल्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी बोलताना यामिनी खामकर यांनी सांगितले की, लहानपणापासूनच गावी असताना सणासुदीला होणारे नाच-गाणे आणि विशेषतः ढोलाचा आवाज त्यांच्या कानात आणि मनात रुजला होता. वडिलांची असलेली ढोल वाजवण्याची आवड आणि त्यांच्या मोलाच्या साथीमुळेच या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. पारंपारिक महाराष्ट्राची आणि विशेषतः कोकणातील शिमगोत्सवाच्या पालखीसोबत वाजवला जाणारा ढोल आज सातासमुद्रापार वाजवताना आणि जागतिक मंचावर आपल्या मातीची संस्कृती पोहोचवताना मन अभिमानाने भरून आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
एका ग्रामीण भागातून निघून थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेल्या यामिनी खामकर यांच्या या जिद्दीने आणि मेहनतीने संपूर्ण गावाला आणि जिल्ह्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल ग्रामस्थांनी आणि विविध मान्यवरांनी तिचे कौतुक केले असून, आगामी प्रवासासाठी तिला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.





