रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आर. पी. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि आर. व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) येथील संशोधन केंद्रात कार्यरत संशोधक सीमा सुधीर देवस्थळी यांना मुंबई विद्यापीठाने नुकतीच रसायनशास्त्र विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र संशोधन केंद्रातून ही पदवी संपादन करणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या असून त्यांच्या या यशाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक लौकिकात मोलाची भर पडली आहे.
सीमा देवस्थळी यांनी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली “स्टडीज ऑन स्ट्रक्चर अँड कॅटॅलिटिक प्रॉपर्टीज ऑफ सपोर्टेड कॅटॅलिस्ट्स” (Studies on Structure and Catalytic properties of Supported Catalysts) या विषयावर आपला शोधप्रबंध यशस्वीरीत्या पूर्ण केला. पर्यावरण संवर्धन आणि हरित रसायनशास्त्राचा विचार करून टाकाऊ वस्तूंपासून उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) तयार करणे, हे त्यांच्या या संशोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांनी विकसित केलेल्या विविध उत्प्रेरकांचा प्रत्यक्ष रासायनिक अभिक्रियांमधील प्रभाव आणि परिणामकारकता तपासून पाहिली असून, अशा प्रक्रियांमुळे निसर्गावर होणारा विपरीत परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो, असा महत्त्वाचा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे.
आपल्या संशोधन कारकीर्दीत सीमा देवस्थळी यांचे दोन शोधनिबंध प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले असून, त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवून आपले शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय संशोधनात्मक कामगिरीबद्दल आणि शैक्षणिक यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी त्यांचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






