देवरुख तहसीलदारांविरोधात महसूलमंत्री बावनकुळे यांच्याकडे तक्रार; कार्यवाहीचे आदेश

Gramin Varta
616 Views

अवैध वाळू, खनिज उत्खननाच्या प्रकरणांमध्ये दिरंगाई, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

रत्नागिरी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान देवरुखच्या तहसीलदारांविरोधात तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रत्नागिरी येथील गोगटे महाविद्यालयाजवळील पटांगणावर आयोजित महाराजस्व अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात महसूल पर्व परिवर्तनाचा अध्याय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील अवैध वाळू, माती व खनिज उत्खननाबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी अवैध उत्खननाला पाठीशी घालण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच उत्खननाच्या प्रकरणांमध्ये दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा संगनमत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

याचवेळी देवरुख येथील तहसीलदार अमृता साबळे यांच्याविरोधात तक्रार सादर करण्यात आली. नागरिकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची, कामकाजात उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तसेच प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची बाब महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीत सुधारणा व्हावी आणि योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.या तक्रारीची महसूल मंत्री बावनकुळे यांनी गंभीर दखल घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे.

Total Visitors :
4622325
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *