संगमेश्वर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी, गणेशभक्त व प्रवासी आपल्या गावी येत असतात. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, गाडी क्र. ०११५३/०११५४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रत्नागिरी गणपती विशेष गाडीला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कडवई तसेच आजूबाजूच्या अनेक गावांमधील नागरिक, प्रवासी आणि गणेशभक्तांसाठी या विशेष गाडीला कडवई येथे थांबा मिळाल्यास मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या या परिसरातील प्रवाशांना या विशेष गाडीचा लाभ घेण्यासाठी इतर रेल्वे स्थानकांवर जावे लागते. त्यामुळे त्यांना अतिरिक्त ऑटो किंवा इतर वाहनांचा खर्च करावा लागतो, तसेच प्रवाशांचा वेळही वाया जातो. ही गैरसोय दूर करण्यासाठी सदर गाडीला कडवई रेल्वे स्थानकावर किमान दोन मिनिटांचा प्रायोगिक थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी सन २०२३ मध्ये ही गाडी दिवा–रत्नागिरी विशेष गाडी म्हणून धावत असताना, कडवई येथे थांबा मिळावा यासाठी स्थानिक नेते श्री. जितेंद्र चव्हाण यांनी आंदोलन करून या गाडीला कडवई येथे थांबा मिळवून दिला होता. मात्र, कालांतराने या गाडीचे स्वरूप बदलून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–रत्नागिरी गणपती विशेष गाडी म्हणून चालविण्यात येत आहे. सध्या या गाडीला कामथे रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला असून, त्याच धर्तीवर कडवई रेल्वे स्थानकावरही थांबा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी, कडवई परिसरातील प्रवाशांची मागणी आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन गाडी क्र. ०११५३/०११५४ ला कडवई रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे फेसबुक ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.





