लांजा : देवधे फाटा येथे ११२ हेल्पलाइनबाबत लांजा पोलिसांकडून जनजागृती

Gramin Varta
402 Views

लांजा/अरबाज नेवरेकर: लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवधे फाटा येथे ग्रामस्थांमध्ये आपत्कालीन मदत क्रमांक ११२ बाबत जनजागृती करण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ‘अनेक सेवांसाठी त्वरित मदत, एकच कॉल डायल ११२’ या संकल्पनेची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

यावेळी संकटाच्या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आदी आपत्कालीन सेवांसाठी ११२ क्रमांकाचा उपयोग करता येतो, याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी मदत मिळण्यासाठी या क्रमांकाचा वापर कसा करावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच, नागरिकांमध्ये ११२ हेल्पलाइन क्रमांकाबाबत अधिकाधिक जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी पोस्टरद्वारे माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. गावातील नागरिकांनी आपत्कालीन प्रसंगी ११२ क्रमांकाचा योग्य पद्धतीने वापर करावा आणि आपल्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही या सुविधेची माहिती द्यावी, असे आवाहन लांजा पोलिसांकडून करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमामुळे देवधे फाटा परिसरातील ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या ११२ हेल्पलाइन सेवेची माहिती मिळाली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Total Visitors :
4590859
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *