लांजा शहरात भटक्या कुत्र्यांचा कुत्र्यांचा उच्छाद; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Gramin Varta
117 Views

लांजा/अरबाज नेवरेकर : लांजा शहरात भटक्या आणि उनाड कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत कुत्र्यांची टोळकी मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे सकाळ-संध्याकाळ पायी चालणारे नागरिक, दुचाकीस्वार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. वाहनांच्या मागे कुत्रे धावणे, अचानक रस्त्यावर येणे आणि नागरिकांच्या अंगावर धावून जाणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.

काही दिवसांपूर्वी शहरातील एका भागात लहान बालिकेवर कुत्र्याने हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतरही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कायम असल्याने एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रात्रीच्या वेळी तर अनेक ठिकाणी कुत्र्यांची टोळकी रस्त्यावर ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. शाळकरी मुलांनाही कुत्र्यांच्या भीतीमुळे पालकांच्या सोबतीने ये-जा करावी लागत आहे.

लांजा नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे केवळ तात्पुरत्या स्वरूपात न पाहता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना तातडीने करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

Total Visitors :
4773914
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *