तणनाशक प्राशन केलेल्या लांजा येथील ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
6 Views
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

लांजा : तणनाशक प्राशन केल्यानंतर उपचारासाठी रत्नागिरी आणि त्यानंतर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लांजा तालुक्यातील ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अशोक जान कदम (वय ६५, रा. उपळे बौद्धवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कदम यांनी तणनाशक प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी प्रथम रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले.

सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना ६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद लांजा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक कदम यांनी तणनाशक नेमके कोणत्या कारणातून प्राशन केले, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेचा पुढील तपास लांजा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Total Visitors :
4717339
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *