बचत गटाच्या ९ लाख ६० हजारांचा अपहार; दापोलीत दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
11 Views

दापोली : विश्वासाने परिधान करण्यासाठी घेतलेले सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवण्यासह महिला बचत गटातील सदस्यांकडून कर्जाच्या हप्त्यांसाठी जमा केलेली लाखो रुपयांची रक्कम बँकेत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा गंभीर प्रकार दापोली तालुक्यातील गिम्हवणे-सुतारवाडी येथे समोर आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण ९ लाख ६० हजार रुपयांच्या अपहाराचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणी पूर्वा गणेश देवघरकर (वय ३८, व्यवसाय गृहिणी, रा. गिम्हवणे-सुतारवाडी, ता. दापोली) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून प्रतिज्ञा विश्वास देवघरकर (वय ३१) आणि विश्वास रमेश देवघरकर (वय ३८), दोघेही रा. गिम्हवणे-सुतारवाडी, ता. दापोली, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञा देवघरकर व विश्वास देवघरकर यांनी तक्रारदारांकडून विश्वासाने परिधान करण्यासाठी घेतलेले सुमारे सहा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र परस्पर बँकेत गहाण ठेवून त्यातून मिळालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे. तसेच तक्रारदारांच्या भावकीतील अनुष्का उमेश देवघरकर यांच्या मालकीची सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुलेही प्रतिज्ञा देवघरकर हिने परिधान करण्यासाठी विश्वासाने घेतली होती. ही कर्णफुलेदेखील परस्पर बँकेत गहाण ठेवून त्यातून मिळालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रतिज्ञा देवघरकर हिची विश्वकर्मा समूह महिला मंडळ बचत गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. बचत गटातील महिलांच्या कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरून देण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती. या विश्वासाचा गैरफायदा घेत तिने तक्रारदारासह बचत गटातील १२ महिलांकडून कर्जाच्या हप्त्यांसाठी सुमारे ४ लाख ६० हजार रुपये जमा केले. मात्र, ही रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय एचडीएफसी बँकेमार्फत महिला बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या सुमारे १० लाख रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी तक्रारदारासह इतर महिलांनी प्रतिज्ञा देवघरकर हिच्याकडे विश्वासाने जमा केलेली सुमारे ५ लाख रुपयांची रक्कमही संबंधित कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वापरण्यात आली नाही. ही रक्कम परस्पर वापरून परतफेड न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवणे तसेच बचत गटाच्या सदस्यांकडून जमा झालेली रक्कम कर्जाच्या हप्त्यांसाठी न भरता तिचा अपहार केल्यामुळे एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.१६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या कलम ३१६(२) आणि ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :
4717334
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *