सोन्याचे दागिने गहाण ठेवून ४ लाख ३४ हजारांचा अपहार; राजापुरात दाम्पत्याविरोधात गुन्हा

Gramin Varta
216 Views

राजापूर : सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेली रक्कम तसेच उर्वरित रोख रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील आंबेरकोणी साखर येथील दाम्पत्याविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे ४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी संगीता अशोक धुमाळ (वय ४०, व्यवसाय गृहिणी, रा. आंबेरकोणी साखर, ता. राजापूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रविंद्र पुनाजी राडये आणि त्यांची पत्नी ऋतिका रविंद्र राडये, दोघेही रा. आंबेरकोणी साखर, ता. राजापूर, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविंद्र राडये यांनी त्यांची पत्नी ऋतिका हिच्या नावावर तक्रारदारांचे सोन्याचे दागिने जुने वापरते श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित, साखर-राजापूर येथे गहाण ठेवले. त्यातून ३ लाख ५४ हजार रुपये रोख रक्कम घेण्यात आली. याशिवाय तक्रारदारांची ८० हजार रुपयांची रोख रक्कम देखील आरोपींनी घेतल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून एकूण ४ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम आरोपींनी स्वतःच्या वापरासाठी घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही रक्कम परत मिळावी यासाठी तक्रारदारांनी आरोपींकडे वारंवार मागणी केली. मात्र, आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच रक्कम परत मागितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात १७ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०५, ४०६, ५०६ आणि ३४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास नाटे पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :
4717314
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *