राजापूर : शहरात शुक्रवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संतोष कोळवणकर यांच्यावर मोकाट गुरांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले.ही घटना गणेश घाट परिसरात घडली. गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा वावर असतो.
याच ठिकाणी सकाळी फिरत असताना एका मोकाट बैलाने अचानक संतोष कोळवणकर यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला.
विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वी राजापूर पालिका प्रशासनाने शहरातील मोकाट जनावरांविरोधात मोहीम राबवत १३ मोकाट जनावरे पकडून चिपळूण येथील गोशाळेत पाठवली होती. या कारवाईनंतर नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र शहरात अजूनही मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरांचा वावर असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
गणेश घाट, शिवाजी पथ, आठवडा बाजार परिसर आणि अन्य प्रमुख रस्त्यांवर मोकाट गुरे मुक्तपणे फिरत असल्याने पादचारी, मॉर्निंग वॉक करणारे नागरिक, दुचाकीस्वार आणि वाहनचालक यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने ही मोहीम सातत्याने राबवून उर्वरित मोकाट जनावरांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





