राजापूरची गंगामाई तब्बल साडेसात महिन्यांनी पुन्हा प्रवाहित; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

Gramin Varta
1015 Views

राजापूर : तब्बल १८५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राजापूरची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली गंगामाई पुन्हा एकदा प्रवाहित झाली आहे. मूळ गोमुखातून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने परिसरातील कुंडांमध्येही पाणी साचू लागले असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा ६ जुलै रोजी गंगामाईच्या आगमनाची चाहूल लागली होती. त्यानंतर गुरुपौर्णिमेपासून मूळ गोमुखातील पाण्याचा प्रवाह वाढत गेला. सध्या गोमुखातून सातत्याने पाणी वाहत असून परिसरातील इतर कुंडांमध्येही पाण्याची पातळी वाढू लागली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
राजापूरची गंगामाई ही नैसर्गिक चमत्कार मानली जाते.

शतकानुशतके या ठिकाणाला धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. पूर्वी गंगामाई साधारणपणे तीन वर्षांनी प्रकट होत असे. डिसेंबर किंवा जून महिन्यात आगमन झाल्यानंतर ती दोन ते अडीच महिने प्रवाहित राहून नंतर अदृश्य होत असे. मात्र गेल्या काही वर्षांत तिच्या आगमनाच्या कालावधीत बदल झाल्याचे दिसून येत आहे.
३० जून २०२५ रोजी गंगामाईचे आगमन झाले होते आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी ती अदृश्य झाली होती. त्यानंतर साडेसात महिन्यांनी पुन्हा गंगामाई प्रवाहित झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गंगामाईच्या आगमनाच्या बदलत्या पद्धतीमागील कारणांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

भूगर्भरचना, जलस्रोत आणि पर्यावरणीय बदलांचा या नैसर्गिक घटनेवर परिणाम होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून यावर वैज्ञानिक संशोधनाची गरज असल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, गंगामाईच्या दर्शनासाठी आणि पवित्र जलाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची वर्दळ वाढू लागली असून राजापूर परिसरात पुन्हा एकदा धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitors :
4609996
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *