प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर कुटगिरी येडगेवाडीतील आमरण उपोषण स्थगित

Gramin Varta
208 Views

संगमेश्वर : तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथे पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे ग्रामस्थांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शुक्रवारी स्थगित करण्यात आले.

तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अमृता साबळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि प्रश्नावर नियमानुसार कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.
गेल्या पाच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या पाच कुटुंबांनी गुरुवारी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार, सार्वजनिक विहिरीतून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणाऱ्या पाईपलाईनप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ४९ अन्वये कारवाईची प्रक्रिया सुरू असून आवश्यक सुनावण्या पूर्ण करून १४ ऑगस्ट २०२६ पूर्वी नियमानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.

या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले असले, तरी दिलेल्या मुदतीत प्रश्नाचा कायमस्वरूपी निकाल लागला नाही तर अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.

यावेळी तहसीलदार अमृता साबळे, प्रभारी गटविकास अधिकारी अक्षय पाटील, पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल बाईत, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, रूपेश कदम तसेच विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि येडगेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Total Visitors :
4609996
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *